शेगाव (, बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील पंचशील नगर परिसरात दारूच्या नशेत पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशन शहर शेगाव येथे आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११७(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. शालिनी सुनिल गवारगुरु (वय ४०) या पंचशील नगर, शेगाव येथील रहिवासी असून मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ७ मे रोजी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास त्या कामावरून घरी परतल्या असता त्यांचे पती सुनिल गवारगुरु हे दारू पिऊन घरी आले होते. यावेळी पत्नीने दारू पिण्याबाबत विचारणा केली असता दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
दरम्यान, बचतगटाचे पैसे भरण्यासाठी फिर्यादींनी पतीकडे पैशांची मागणी केली. मात्र आरोपीने पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केली. त्यानंतर संतापलेल्या आरोपीने पत्नीच्या नाकावर, डोक्यावर व तोंडावर जोरदार बुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता खाली पडलेल्या पत्नीला लाथांनी पाठीवर मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या मारहाणीत महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. घटनेनंतर आरोपी घराबाहेर पळून गेला. जखमी महिलेला त्यांच्या बहिणी व मुलींनी उपचारासाठी शेगाव येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे हलविण्यात आले.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जखमी महिलेचा जबाब नोंदविण्यात आला असून वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई सुरू आहे.














