मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्नाच्या आनंदावर अवघ्या काही दिवसांतच दु:खाचा डोंगर कोसळल्याची हृदयद्रावक घटना मोताळा तालुक्यातील खरबडी येथे घडली. लग्न होऊन अवघे सोळा दिवस झाले असताना पुणे येथे कंपनीच्या बैठकीसाठी निघालेल्या तरुण इंजिनिअरचा छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे खरबडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दीपक कैलास निकाळजे असे मृत तरुणाचे नाव आहे. दीपकने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून पुणे येथील एका नामांकित कंपनीत नोकरी मिळवली होती. २६ एप्रिल २०२६ रोजी त्याचा विवाह मोताळा तालुक्यातील तरोडा येथील शुभांगी हिच्यासोबत मोठ्या उत्साहात पार पडला होता. नव्या संसाराची स्वप्ने रंगवित असतानाच नियतीने घात केला.
लग्नानंतर अवघ्या दहाव्या दिवशी कंपनीच्या बैठकीसाठी दीपक ५ मे रोजी दुचाकीने पुण्याकडे निघाला होता. मात्र, छत्रपती संभाजीनगरजवळ त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर ११ मे रोजी रात्री त्याची प्राणज्योत मालवली. मंगळवार, १२ मे रोजी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कष्टातून मुलांना घडविणाऱ्या आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर…
दीपकचे वडील कैलास निकाळजे यांनी सामान्य ज्ञानाची पुस्तके व कपड्यांचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी दोन मुलगे आणि दोन मुलींना उच्च शिक्षण दिले. आई नलूबाई यांनीही शेतीची कामे करून मुलांच्या शिक्षणासाठी काबाडकष्ट केले.
दीपकचे प्राथमिक शिक्षण खरबडी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर मोताळ्यातील स्व. बी. डी. विद्यालयातून बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून चिखली येथे बीई मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. त्याचा धाकटा भाऊ ऋषिकेश हा पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. मोठी बहीण ज्योतीने फार्मसीचे शिक्षण पूर्ण केले असून दुसरी बहीण रोशनी ही एलएलबी अंतिम वर्षाला शिकत आहे.
घरातील कर्ता मुलगा, नुकताच संसाराला सुरुवात केलेला दीपक अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने निकाळजे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावभर या घटनेची हळहळ व्यक्त होत असून, “अंगाची हळदही सुकली नव्हती आणि काळाने घाला घातला,” अशा शब्दांत ग्रामस्थ भावना व्यक्त करत आहेत.












