देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)तालुक्यातील पाडळी शिंदे येथे भुसार माल खरेदी करणारा व्यापारी पैसे न देता फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात परिसरातील शंभर ते दीडशे शेतकऱ्यांचा तब्बल एक कोटी रुपयांहून अधिक किमतीचा भुसार माल अडकला असून, खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
दिनकर दामोदर शेळके असे फरार व्यापाऱ्याचे नाव असून, तो गेल्या पंधरा वर्षांपासून परिसरात भुसार माल खरेदीचा व्यवसाय करत होता. गावातीलच व्यापारी असल्याने शेतकऱ्यांनी विश्वासाने त्याला तूर, हरभरा, सोयाबीनसह विविध भुसार माल विकला होता. मात्र १ मे रोजी सकाळी दिनकर शेळके अचानक घरातून निघून गेला. विशेष म्हणजे त्याने स्वतःचा मोबाईलही घरीच ठेवला होता. कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी शोध घेतला, मात्र त्याचा कुठेही माग लागला नाही.
दरम्यान, ४ मे रोजी व्यापाऱ्याची पत्नी, भाऊ विजय उगले व सासरे दामोदर शेळके यांनी अंढेरा पोलीस ठाण्यात दिनकर शेळके बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर ११ मे रोजी नवीनच घडामोड समोर आली. व्यापाऱ्याचा साला विजय उगले हा शेतकऱ्यांच्या माल खरेदीची बिलबुक, कागदपत्रे आणि काही रोकड घेऊन घरातून निघून जात असल्याचे काही शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. ही माहिती गावात पसरताच संतप्त शेतकरी थेट अंढेरा पोलीस ठाण्यात दाखल झाले.
शेतकऱ्यांनी प्रभारी ठाणेदार हेमंत शिंदे यांच्यासमोर आपली व्यथा मांडली. व्यापारी दिनकर शेळके याला त्याच्याच साल्याने कुठेतरी लपवून ठेवल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तसेच व्यापाऱ्याने स्वतःच्या नावावरील शेतजमीन, प्लॉट, घरे आणि इतर मालमत्ता साला, सासू व सासऱ्यांच्या नावावर केल्याची माहितीही शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली.
या प्रकारामुळे खरीप हंगामासाठी बी-बियाणे, खत व मशागतीचा खर्च कसा भागवायचा, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू असून, फरार व्यापाऱ्याचा शोध घेतला जात आहे.













