अंढेरा (बुलडाणा कव्हरेज न्युज): “चिखलीला साडी पिको फॉल करायला जाऊन येते” असं सांगून घरातून निघालेली बाई थेट बेपत्ता झाल्याची घटना समोर आलीये. चिखली तालुक्यातील कोनड खुर्द येथील ३६ वर्षीय राजश्री उर्फ मनिषा ज्ञानेश्वर जावळे हिचा काहीच ठावठिकाणा लागत नसल्याने परिसरात खळबळ उडालीये.
याबाबत पती ज्ञानेश्वर निंबाजी जावळे यांनी २२ एप्रिल रोजी अंढेरा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजश्री ही चिखलीला पिको फॉल करण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघाली होती. दरम्यान त्यांचा मुलगा गणेश सकाळी ९ वाजता शेतात कामाला गेला होता. सायंकाळी ४ वाजता घरी परत आल्यावर आई घरी नसल्याचे त्याला दिसले.
संध्याकाळपर्यंत ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शेजारी तसेच चिखली परिसरात शोधाशोध केली, मात्र कुठेही ती सापडली नाही.
बेपत्ता महिलेचे वर्णन असे — उंची अंदाजे ५ फूट, रंग सावळा, केस लांब काळे, बांधा साधारण. अंगावर जांभळ्या रंगाची साडी, भुरकट ब्लाऊज, पायात काळ्या रंगाची चप्पल. गळ्यात पिवळ्या धातूचे दाणी व गहूपोथ, कानात झुंबर, नाकात मोरणी, तसेच पायात पांढऱ्या धातूच्या चेन पट्ट्या व जोडवे आहेत.
अशी महिला कुणाला दिसून आल्यास अंढेरा पोलीस स्टेशनला तात्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या प्रकरणी बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.












