Advertisement Advertisement

वाढदिवशी केक नाही, गीता वाटून सरांनी दाखवला नवा मार्ग! आगळावेगळ्या उपक्रमांनी प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस साजरा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : देऊळगाव घुबे येथील सुप्रसिद्ध जानकीदेवी विद्यालयाचे सचिव तसेच मेरा खुर्द येथील विठ्ठल पार्वती अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. उद्धवराव घुबे यांचा वाढदिवस यंदा समाजाभिमुख आणि शैक्षणिक उपक्रमांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नेहमीच सक्रिय असलेल्या प्रा. घुबे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व अध्यात्माची जाणीव निर्माण करण्यासाठी विशेष उपक्रम राबविला. त्यांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या सुमारे ५१ प्रती देऊळगाव घुबे येथील जानकीदेवी विद्यालय, अमोना व इसरूळ येथील जिल्हा परिषद शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटप केल्या.

या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना भगवद्गीतेसारख्या पवित्र ग्रंथाशी परिचित करून देणे हा असून, पुढील वर्षी ११ एप्रिलपर्यंत विद्यार्थ्यांनी हा संपूर्ण ग्रंथ वहीमध्ये लिहून पूर्ण करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हा उपक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक शाळेतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला २१०० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

मोबाईलच्या वाढत्या वापराच्या युगात विद्यार्थ्यांना सकारात्मक दिशेने वळवण्याचा आणि अध्यात्मिक मूल्यांची जाणीव करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

प्रा. घुबे यांनी यापूर्वीही राष्ट्रमाता जिजाऊ महोत्सव, राष्ट्रीय सेवा योजनेतून ग्रामस्वच्छता अभियान, पथनाट्याद्वारे जनजागृती, माजी सैनिकांचा सत्कार, महिला बचत गटांना आर्थिक मदत, तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन अशा विविध उपक्रमांतून समाजसेवा केली आहे.

अमोना येथे शाळा समिती अध्यक्ष गजानन पाटील इंगळे, मधुकर मामा वाघ, अंबादास महाराज, डॉ. शिवदास भांदर्गे यांच्यासह शिक्षक व नागरिक उपस्थित होते. इसरूळ येथे सरपंच सतीश पाटील भुतेकर, ग्रामपंचायत सदस्य, मुख्याध्यापक व गावकरी उपस्थित होते. तसेच जानकीदेवी विद्यालयात केंद्रप्रमुख बळकर साहेब, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमाचे समाजात सर्वत्र कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शेणफड रावजी घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. उद्धवराव घुबे हे सातत्याने समाजाभिमुख कार्य करत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे वाढदिवस साजरा करण्याचा एक नवा आदर्श समाजासमोर निर्माण झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!