बुलढाणा(बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यातील तब्बल ११ तालुक्यांतील २०९ गावे या पावसामुळे बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. या अवकाळी पावसामुळे हजारो हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील जळगाव जामोद व मलकापूर तालुक्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले आहे. अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी, कांदा यांसारख्या पिकांना मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी उभे असलेले गव्हाचे पीक जमीनदोस्त झाले असून हरभऱ्याची शेंग गळून पडली आहे. काही भागांत वादळी वाऱ्यामुळे झाडेही पडली आहेत.
अधिकाऱ्यांनी केलेल्या प्राथमिक पाहणीत २०९ गावांमधील मोठ्या क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकऱ्यांनी पिके काढणीच्या तयारीत असतानाच अवकाळी पावसाने घात केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून तातडीने पंचनामे करून मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून कृषी विभाग आणि महसूल विभागाचे अधिकारी शेतात जाऊन पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.













