देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)देऊळगाव राजा शहरात एक अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या अल्पवयीन मुलासोबत अयोग्य वर्तन केल्याचा तसेच पत्नीवर जबरदस्तीने वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडित ३० वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते मार्च २०२६ दरम्यान घडला. या काळात आरोपीने पत्नीचा छळ करत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले, अशी माहिती समोर आली आहे.
महिलेने हा प्रकार सासरच्या मंडळींना सांगितल्यानंतर तिला मदत मिळण्याऐवजी उलट धमक्या देण्यात आल्या. “कोणाला सांगितले तर जिवे मारू,” असे सांगून तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न झाला. तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी तिचा छळही करण्यात आला.
या प्रकरणी पोलिसांनी पतीसह एकूण १३ जणांविरुद्ध पोक्सो कायदा व इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.











