जळगाव जामोद (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात गेल्या काही तासांपासून बिबट्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आ. डॉ. संजय कुटे यांच्या निवासस्थानाजवळील सिद्धिविनायक नगर परिसर तसेच महात्मा फुले कन्या शाळा आणि न्यू इरा शाळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याची हालचाल कैद झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच आ. संजय कुटे यांचे स्वीय सहाय्यक निलेश शर्मा यांनी पहाटेच वनविभाग, पोलीस, महसूल व नगरपरिषद प्रशासनाला सतर्क केले. यानंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत गस्त वाढवली असून बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव न्यू इरा हायस्कूलला मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आली.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे. पहाटे किंवा रात्री बाहेर पडणे टाळावे, मॉर्निंग वॉक काही दिवसांसाठी बंद ठेवावा, लहान मुलांना एकटे बाहेर सोडू नये आणि घराच्या परिसरात पुरेसा प्रकाश ठेवावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा.
प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन केले असून बिबट्याला पकडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले आहे














