लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील वझर आघाव परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून बिबट्याने वासराची शिकार केल्याची घटना १६ मार्च रोजी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वझर आघाव परिसरातील एका शेतकऱ्याच्या शेतात गहू काढण्याचे काम सुरू असताना वासरू मृत अवस्थेत आढळून आले. वासरू मारण्यात आल्याचे लक्षात येताच शेतकऱ्यांनी परिसरात पाहणी केली असता जवळच दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्या नजरेस पडला. अचानक बिबट्या दिसताच शेतकऱ्यांनी आरडाओरड केली असता तो तेथून पळ काढत जवळील मक्याच्या शेतात पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच सरपंच संतोष साळवे व शिवछत्र मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नंदु भाऊ मापारी यांनी वन विभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच जनावरांची काळजी घ्यावी व बिबट्या दिसल्यास तत्काळ वन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.













