चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):
चिखली तालुक्यातील डोंगरशेवली गावातून २५ वर्षांची विवाहित महिला आपल्या दोन वर्षांच्या चिमुकल्या मुलासह अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.
डोंगरशेवली येथील रहिवासी लक्ष्मीबाई आनंदा सुरडकर (वय ५०) यांची मुलगी अश्विनी महिंद्र आराख ही ७ मार्च २०२६ रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली. नातेवाईकांनी व ओळखीच्या लोकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र दोघांचा कुठेही पत्ता लागला नाही.
याप्रकरणी लक्ष्मीबाई सुरडकर यांनी ९ मार्च रोजी अमडापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता महिला अश्विनी आराख हिचा रंग काळा-सावळा असून तिने शेंदरी रंगाची साडी व काळ्या रंगाचे ब्लाउज परिधान केले होते. या महिलेबाबत अथवा तिच्या मुलाबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास अमडापूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अंमलदार निवृत्ती चेक यांनी आव्हान केले आहे.











