बुलढाणा : (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील एका खेडेगावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी बकऱ्यांसाठी पाला आणायला गेल्यानंतर परत न आल्याने ती बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी हे मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी ही इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत आहे. शुक्रवार, ६ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास ती बकऱ्यांसाठी पाला आणण्यासाठी गावाजवळील शेतात गेली होती. मात्र बराच वेळ उलटूनही ती घरी परतली नाही.
मुलगी घरी न आल्याने कुटुंबीयांनी गावातील शेत परिसर, नातेवाईक व मैत्रिणींकडे शोध घेतला; परंतु तिचा काहीही पत्ता लागला नाही. अखेर अज्ञात व्यक्तीने फूस लावून मुलीला पळवून नेल्याची शक्यता व्यक्त करत बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलीस करीत आहेत.












