पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज): सैलानी यात्रेजवळील जंगलाला शुक्रवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. यात्रा सुरू असलेल्या परिसरालगतच आग लागल्याने काही काळ भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश सोळंकी यांनी तात्काळ दखल घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.
सध्या सैलानी बाबांची यात्रा सुरू असल्यामुळे परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित आहेत. यात्रेच्या परिसरातील वनक्षेत्रात अनेक भाविकांनी तात्पुरत्या झोपड्या उभारून मुक्काम केला आहे. आग वेळीच आटोक्यात आली नसती तर मानवी जीवितहानीसह मोठ्या नुकसानीची शक्यता होती, असे स्थानिकांकडून सांगण्यात आले.
अग्निशमन दलाच्या तत्पर कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती संबंधित प्रशासनाकडून देण्यात आली.















