चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): चिखली विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या विकासात्मक वाटचालीवर विश्वास ठेवत अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकास धोरणाला पाठिंबा देत हा पक्षप्रवेश करण्यात आला.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि चिखली मतदारसंघातील आमदार श्वेता महाले यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामध्ये शेलगाव येथील सरपंच अरुण सरनाईक (अन्वी गट ग्रामपंचायत, शिंदे गटातून भाजपात), माजी उपसरपंच नितीन घेवंदे, ग्रामपंचायत सदस्य सागर सुरडकर, मदन आंभोरे, अमोल सरनाईक, गजानन ठेंग, गजानन चव्हाण व नितीन आंभोरे आदींनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.
सरपंच, माजी उपसरपंच आणि सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे चिखली मतदारसंघात भाजपाची ताकद आणखी वाढल्याचे बोलले जात आहे. यावेळी पक्षात प्रवेश करणाऱ्या सर्वांचे स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
















