पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज):तालुक्यातील पिंपळगाव सराई येथे चोरट्यांनी एका शेतकरी कुटुंबाच्या घरावर डल्ला मारत तब्बल ९२ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाल रामलाल शिंगणे यांच्या राहत्या घरात अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात घुसून कपाट व दोन लोखंडी पेट्या फोडल्या. त्यामधून सुमारे ८ हजार रुपयांची रोख रक्कम, गळ्यातील ४० नग गहूमणी माळ, सोन्याचे पेंडॉल तसेच लहान मुलांच्या कानातील सोन्याच्या बाळ्या असा एकूण ९२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला.
या प्रकरणी विशाल शिंगणे यांनी १४ फेब्रुवारी रोजी रायपूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार निलेश सोळंके यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
यानंतर डॉग स्कॉड व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. डॉग स्कॉडने परिसराची पाहणी केली, तर फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले. फिंगरप्रिंट तज्ज्ञांनाही तपासासाठी बोलावण्यात आले असून चोरट्यांचा मार्ग काढण्याचे काम सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. कैलास खर्डे, पोलीस कॉन्स्टेबल अझरुद्दीन काझी व अनंत कळमकर करीत आहेत.












