बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):
पोलीस दल हे जनतेच्या रक्षणासाठी असून गुन्हेगारांच्या मदतीसाठी नाही, हे ठणकावत ‘मिशन परिवर्तन’च्या आड येणाऱ्यांना कोणतीही माफी नाही, असा स्पष्ट संदेश देत पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी गांजा तस्करीत सहभागी असलेल्या एका पोलीस अंमलदाराला थेट सेवेतून बडतर्फ केले आहे. ही कारवाई म्हणजे खाकीत राहून खाकीशी गद्दारी करणाऱ्यांसाठी मोठा धडा ठरत आहे.
मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा व्यसनमुक्त करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन परिवर्तन’मुळे पोलीस दलाला जनतेत आदराचे स्थान मिळाले असताना, दलातीलच एका कर्मचाऱ्याने या विश्वासाला तडा देण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. छत्तीसगड पोलिसांनी केलेल्या मोठ्या कारवाईत ४ कोटी ७५ लाख रुपयांच्या गांजा तस्करी प्रकरणात बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेला पोलीस अंमलदार प्रदीप मुसादवाले याचा सहभाग असल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे काही काळासाठी बुलढाणा पोलीस दलाची मान खाली गेली असली, तरी प्रकरण समोर येताच पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कठोर भूमिका घेतली. “चुकीला माफी नाही,” हे स्पष्ट करत गंभीर गुन्हेगारी कृत्य व शिस्तभंगाच्या आरोपाखाली संबंधित कर्मचाऱ्याला तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याचे आदेश त्यांनी दिले.
या ‘ऑन द स्पॉट’ निर्णयामुळे वर्दी कोणालाही संरक्षण देत नाही, तर कायदा सर्वांसाठी समान आहे, असा ठाम संदेश पोलीस दलासह समाजात गेला आहे. ‘मिशन परिवर्तन’च्या मार्गात अडथळा आणणाऱ्यांना कोणतीही तडजोड न करता कारवाई केली जाईल, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.














