चिखला काकडा (बुलडाणा कव्हरेज न्युज):लोणार तालुक्यातील किनगावजट्ट येथून मातमळकडे नेटव्या कामासाठी महिला मजूर घेऊन जाणाऱ्या ऑटोला भरधाव वेगातील स्विफ्ट डिझायर कारने जबर धडक दिल्याने भीषण अपघात झाला. ही घटना रविवारी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास सरस्वती नदीजवळ बाजड यांच्या शेतालगतच्या वळणावर घडली.
या भीषण अपघातात जरिनाबी अय्युबशहा (वय ४५) या महिला मजुराचा जागीच मृत्यू झाला असून ८ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. धडकेनंतर ऑटो पलटी झाल्याने महिला मजूर रस्त्याच्या कडेला फेकल्या गेल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये रंजना परमेश्वर कास्तोडे (५३), शांताबाई शेवाळे (४५), कल्पना विठ्ठल जमधाडे (४०), अलका मधुकर शेवाळे (४०), लक्ष्मण बबन करवले (४५), चंद्रभागा गजानन नागरे (५०), राधा गजानन गायकवाड तसेच ऑटोचालक आसिष्ठ निशालशहा (३०) यांचा समावेश आहे.
अपघातानंतर कार चालक घटनास्थळावरून फरार झाला असून संबंधित स्विफ्ट डिझायर कार (क्र. MH14 AF 5821) ही हिंवराखंड येथील असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त ऑटोचा क्रमांक MH28 R 2211 आहे.
घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रकाश सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय धनंजय इंगळे हे करीत आहेत.














