Advertisement Advertisement

दीड लाख रुपये देऊन लग्न ठरवलं, थाटामाटात लग्नही केलं; नवरी घरी आली, दोन दिवस राहिली अन् तिसऱ्या दिवशी मात्र…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लग्न जुळवून देण्याच्या नावाखाली दीड लाख रुपये घेऊन विवाहानंतर अवघ्या दोन दिवसांतच नवरी घरातून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर धामणगाव येथील मोहन राजाराम देवकर (वय २९) यांनी धाड पोलिसांत तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी अंढेरा येथील नारायण किसन आंधळे आणि लातूर येथील सविता अण्णा सांगळे या दोघांना अटक केली आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, नारायण आंधळे याने मोहन देवकर यांना सविता सांगळे हिचा फोटो मोबाईलवर दाखवून लग्न जुळविण्याचे ठरविले. त्यासाठी दीड लाख रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी दुधा येथील श्री मर्दडी देवी संस्थानात दोघांचा विवाह पार पडला. मात्र, विवाहाला अवघे दोन दिवस उलटत नाहीत तोच नवरी घरातून निघून गेली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे देवकर यांच्या लक्षात आले.

या प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी देवकर यांनी धाड पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीसाठी पैसे देण्यास प्रवृत्त करणे आणि गुन्हेगारी कटात सहभागी असल्याच्या आरोपांनुसार गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम नारायण आंधळे याला अंढेरा परिसरातून अटक केली.

त्यानंतर सविता सांगळे हिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी वेगळी शक्कल लढविली. लग्नासाठी मुलगा असून दोन लाख रुपये देण्याची तयारी असल्याचे सांगून तिच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. या माध्यमातून पोलिसांनी सापळा रचला.

ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार समाधान देशमाने आणि सहायक फौजदार शांताराम जाधव यांनी ३ नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथून सविता सांगळे हिला अटक केली. न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली असून, लग्न जुळविण्याच्या नावाखाली झालेल्या या कथित फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास धाड पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!