बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दहावी आणि बारावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२७ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत पार पडणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीचे नियोजन करण्यासाठी अधिकृत वेळापत्रक उपलब्ध झाले आहे.
बारावीची परीक्षा ८ फेब्रुवारीपासून, तर दहावीची १५ फेब्रुवारीपासून!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १८ मार्च २०२७ पर्यंत चालणार आहे. तर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होऊन १५ मार्च २०२७ रोजी संपणार आहे.
प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर!
लेखी परीक्षेपूर्वी बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत घेण्यात येणार आहेत. तर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत.
६ नोव्हेंबरपासून संकेतस्थळावर वेळापत्रक उपलब्ध!
परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत mahahscboard.in या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबर २०२६ पासून उपलब्ध करून देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन आपल्या विषयानुसार परीक्षेच्या तारखा आणि वेळा तपासून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा-महाविद्यालयाकडून मिळणारे वेळापत्रकच अंतिम!
दरम्यान, मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेले वेळापत्रक केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी संबंधित शाळा, माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रकच अंतिम राहणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
त्यामुळे दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाचे नियोजन करावे, परीक्षेच्या तारखांची नोंद ठेवावी आणि शाळा-महाविद्यालयाच्या सूचनांकडे लक्ष द्यावे. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाल्याने आता विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला वेग येणार आहे.
















