Advertisement Advertisement

मोबाईलवरची स्टोरी पडली अख्ख्या कुटुंबाला महागात!माफी मागायला गेलेल्या बापलेकावर जमाव तुटून पडल्याचा आरोप! वडिलांचा मृत्यू; मेहकर तालुक्यात संतापाची लाट!

मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सोशल मीडियावर टाकलेल्या एका इन्स्टाग्राम स्टोरीचा वाद थेट एका कुटुंबाच्या आयुष्यावर बेतल्याची धक्कादायक घटना भालेगाव (ता. मेहकर) येथे समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या छायाचित्रासोबत आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याच्या कारणावरून १६ वर्षीय विद्यार्थ्याला माफी मागण्यास सांगण्यात आले. मुलाने चूक मान्य करून माफी मागितल्यानंतरही वाद थांबला नाही. उलट, घरासमोर जमाव जमवून मुलासह त्याच्या वडिलांना मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेदरम्यान प्रकृती खालावल्याने वडील निलेश अशोकराव निकम यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण भालेगाव परिसर हादरला आहे.

इन्स्टाग्राम स्टोरीवरून वादाची ठिणगी!

मृत निलेश निकम यांचा मुलगा विराज हा अमरावती येथील शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयात प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. त्याने २ ऑक्टोबर २०२६ रोजी इन्स्टाग्रामवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पार्श्वभूमीवर आक्षेपार्ह मजकूर असलेली स्टोरी पोस्ट केली होती. यावरून ३ ऑक्टोबर रोजी मेहकर येथील वेदांत भाळशंकर याने फोन करून जाब विचारला. त्यावेळी विराजने आपली चूक मान्य करीत पुन्हा अशी चूक होणार नाही, असे सांगून माफी मागितली. मात्र, त्यानंतरही त्याला मेहकरला येण्यास सांगून धमकावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे.

मध्यस्थी करूनही वाद मिटेना!

या प्रकाराची माहिती विराजने आपले दाजी ऋषिकेश थोरात यांना दिली. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी दुपारी त्यांनी मेहकर येथील संबंधित तरुणांची मातोश्री पान सेंटरसमोर भेट घेऊन विराजच्या वतीने माफी मागितली. मात्र, ‘आम्ही आमच्या पद्धतीने पाहून घेऊ,’ असे उत्तर मिळाल्याचा आरोप आहे. त्याच दिवशी दुपारी सुमेध अवसरमोल याने विराजला फोन करून यावेळी माफी मागितल्यामुळे सोडत असल्याचे सांगितले. मात्र, पुढे अशी चूक करू नये, असा इशाराही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

सायंकाळी घरासमोर तरुणांचा जमाव; पिता-पुत्राला मारहाण!

१० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास निलेश निकम शेतातून घरी परतत असताना काही तरुण मोटारसायकलींवरून त्यांच्या मागे घरासमोर आले. वडिलांनी आवाज दिल्याने विराज घराबाहेर आला. त्यावेळी मेहकरसह अंजनी बुद्रुक, नांद्रा धांडे, वरुड आणि भालेगाव येथील काही तरुण उपस्थित असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संबंधितांनी विराजला माफी मागण्यास सांगितले. तो माफी मागत असतानाच त्याला आणि त्याच्या वडिलांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे.

त्यानंतर पिता-पुत्राला गावातील वाटिका परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नेण्यात आले. तेथे पुन्हा माफी मागण्यास सांगून मारहाण केल्याचे विराजने तक्रारीत म्हटले आहे. वडिलांच्या छातीत दुखत असल्याचे सांगून त्यांना मारहाण करू नये, अशी विनंतीही विराजने केली. मात्र, त्यानंतर निलेश निकम यांना अचानक चक्कर येऊन ते बेशुद्ध पडले. यावेळी विराज माफी मागत असतानाचा व्हिडिओ काही तरुणांनी काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे.

रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले!

घटनेची माहिती मिळताच निलेश निकम यांचे भाऊ शरद निकम, चुलत भाऊ अंकुश निकम आणि पार्थ निकम घटनास्थळी पोहोचले. त्यांनी निलेश यांना तातडीने चारचाकी वाहनातून मेहकर येथील गाभणे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. वडिलांच्या मृत्यूमुळे मोठा मानसिक धक्का बसलेल्या विराजने दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार दाखल केली. मारहाणीमुळेच आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याने केला आहे.

अनेक संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल; तपासाकडे लक्ष!

या प्रकरणात वेदांत प्रकाश भाळशंकर, रणजीत सुरेश सदावर्ते, पवन, करण वानखेडे, सुमित दीपक मोरे, अनुराग किशोर शेजुळ, पंकज अशोक सोनुने, सुमेध गौतम अवसरमोल, कार्तिक राजू आंभोरे यांच्यासह भालेगाव येथील ऋतिक दीपक सिरसाट, अनिकेत केशव अवसरमोल, वैभव अशोक गवई, बबन भाऊराव अवसरमोल, उमेश लक्ष्मण मिसाळ, बारक्या उर्फ करण वसुदेव अवसरमोल, धम्मपाल किशोर अवसरमोल, संग्राम संजय अवसरमोल, जीवन हिम्मत गवई, केशव आत्माराम अवसरमोल आणि विलास उत्तम अवसरमोल यांच्यासह इतर व्यक्तींवर आरोप करण्यात आले आहेत.

विराजच्या तक्रारीवरून मेहकर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १०५, ११५(२), १८९(२), १९१(२), १९० आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सोशल मीडियावरील एका स्टोरीचा वाद, माफी मागण्याचे प्रयत्न आणि त्यानंतर झालेल्या मारहाणीच्या आरोपातून एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नेमकी मारहाण कशी झाली, त्यात कोणाची काय भूमिका होती आणि निलेश निकम यांच्या मृत्यूचे वैद्यकीय कारण काय, हे पोलिसांच्या पुढील तपासातून स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे भालेगावसह मेहकर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!