मलकापूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : घरासमोर फटाके फोडून ते घराच्या दिशेने फेकू नका, असे म्हणताच चौघांनी घरमालकासह त्याच्या पुतण्याला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बेलाड येथे घडली. एवढेच नव्हे तर भांडण सोडविण्यासाठी आलेल्या मुलीशीही गैरवर्तन केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध पॉस्को कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संतोष अरुण संबारे (रा. बेलाड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दीपक माणिकराव संभारे (वय २२), रोशन माणिकराव संभारे (वय २५), हरीश श्रीकृष्ण संभारे (वय २४) आणि पप्पू अरुण संभारे (वय २३, सर्व रा. बेलाड) हे घरासमोर हातात फटाके घेऊन ते घराच्या दिशेने फेकत होते.
यावेळी संतोष संबारे यांनी घराच्या दिशेने फटाके फेकू नका, असे म्हणत त्यांना हटकले. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या पुतण्यालाही मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
दरम्यान, सुरू असलेला वाद सोडविण्यासाठी संतोष संबारे यांची मुलगी पुढे आली असता आरोपींनी तिला वाईट उद्देशाने पकडून तिच्या सन्मानाला ठेच पोहोचेल असे कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५६/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह पॉस्को कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करीत आहेत.














