Advertisement Advertisement

दोन वर्षांपासून पीक फेरा अडकला, शेतकऱ्यांचा पारा चढला! तहसीलदारांच्या दालनात काळ्या फिती लावून ठिय्या; पाच हजारांची मदतही खात्यात पडेना!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : दोन वर्षांपासून ई-पीक पाहणी (पीक फेरा) आणि शेतजमिनींच्या ऑनलाइन लोकेशनमधील तांत्रिक अडचणी दूर होत नसल्याने भरोसा भाग-१ हद्दीतील शेतकऱ्यांचा संताप अखेर उफाळून आला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे निर्माण होत असून, जाहीर झालेली पाच हजार रुपयांची दुष्काळी मदतही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी ९ नोव्हेंबर रोजी तहसीलदारांच्या दालनात काळ्या फिती लावून ठिय्या आंदोलन केले. सकाळी १२ ते दुपारी ४ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते.

भरोसा भाग-१ हद्दीतील अनेक शेतकऱ्यांची मागील दोन वर्षांपासून ई-पीक पाहणी ऑनलाइन होत नसल्याची समस्या कायम आहे. त्यामुळे संबंधित शेतकरी शासनाच्या विविध योजनांच्या लाभांपासून वंचित राहत आहेत. विशेष म्हणजे, काही शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ऑनलाइन पूर्ण केली असतानाही पोर्टलवरून त्यांची नोंद आपोआप डिलीट झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. दुसरीकडे शेतजमिनींच्या ऑनलाइन लोकेशनमध्येही तांत्रिक त्रुटी असल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या तांत्रिक घोळाचा फटका थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीला बसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली होती.

वारंवार अडचणी येत असूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने अखेर संतोष पाटील भुतेकर यांनी शेतकऱ्यांसह तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलनकर्त्यांनी काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध नोंदवला. ई-पीक पाहणीतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांच्या नोंदी पूर्ववत कराव्यात आणि ऑनलाइन लोकेशनचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनाची दखल घेत नायब तहसीलदार गायकवाड तसेच भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र, दोन वर्षांपासून रखडलेला हा प्रश्न प्रत्यक्षात कधी सुटणार आणि पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदत कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आंदोलनात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग

या आंदोलनात संतोष पाटील भुतेकर, नमुना शिंदे, पंजाबराव जावळे, गणेश उसर, समाधान उसर, भास्कर शिंदे, मधुकर उसर, सुखदेव गाडेकर, दत्ता पाटील थुटे, भगवानराव शिंदे, नारायण सर, विलास उसर, सचिन शिंदे, आकाश उत्सव, गजानन शिंदे, गजानन उसर, सिद्धेश्वर उसर, भागवत उसर, शेषराव जाधव यांच्यासह भरोसा भाग-१ मधील अनेक शेतकरी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!