Advertisement Advertisement

मुंबईचे लोक आणून जमीन खाली करायला लावू!चांदणी तलाव कमानीसमोरचा प्रकार; जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार!

सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील एका महिलेला जातीवाचक व अपमानास्पद शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आकाश विश्वजीत चौधरी (पाटील), वय ३२, रा. मालाड पूर्व, मुंबई याच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, मीना विश्वजीत पाटील या ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १.४० ते २ वाजेदरम्यान चांदणी तलाव कमानीसमोरून जात होत्या. यावेळी संबंधित व्यक्तीने त्यांना उद्देशून जातीवाचक व अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या वाहनातून फिरण्याच्या अधिकारावरून आक्षेप घेत धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

विशेष म्हणजे, जमिनीच्या वादातून संबंधित व्यक्तीकडून यापूर्वीही त्रास दिला जात असल्याचा आरोप महिलेने केला आहे. मुंबईतील लोक आणून संबंधित जमीन खाली करण्यास भाग पाडू, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. घटनेच्या वेळी महिलेची मुलगीदेखील त्यांच्यासोबत उपस्थित होती.

या तक्रारीची दखल घेत सिंदखेडराजा पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ चे कलम ३(१)(आर), ३(१)(एस) तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २९६, ३५१(२) आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक अर्जुन भगवानराव ठोसरे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!