खामगावात विनयभंगाच्या गुन्ह्यातील फरार युवकाची आत्महत्या; मृतदेह उचलण्यास नातेवाइकांचा नकार!
पीडितेच्या कुटुंबीयांनी धमकावल्याचा नातेवाइकांचा आरोप; शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या, कारवाईच्या मागणीने तणाव…
खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या फरार युवकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २७ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. या घटनेनंतर बुधवारी खामगावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पीडितेच्या कुटुंबीयांनी मंगळवारी रात्री धमकावल्यामुळेच युवकाने टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप मृत युवकाच्या नातेवाइकांनी केला. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
घटनेनंतर बुधवारी सकाळी संतप्त नातेवाइकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन आपला रोष व्यक्त केला. त्यानंतर सायंकाळी पाच वाजतानंतर खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर नातेवाइकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. युवकाच्या मृत्यूला पीडितेच्या कुटुंबीयांना जबाबदार धरत, त्यांच्यावर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाइकांनी घेतली. त्यामुळे रुग्णालय परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली.
धमकी देणाऱ्यांवर कारवाईची मागणी…
मृत युवकाच्या नातेवाइकांच्या आरोपानुसार, मंगळवारी रात्री पीडितेच्या कुटुंबीयांनी युवकाच्या कुटुंबीयांना धमकावले होते. या प्रकारामुळेच युवकाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा दावा नातेवाइकांनी केला. संबंधित कुटुंबातील सदस्यांना तातडीने अटक करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, हे आरोप असून त्यांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे.
पोलिसांची धावपळ; सीसीटीव्ही तपासण्याचे लेखी आश्वासन….
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक मंदार पुरी तसेच शिवाजीनगर व शहर पोलिस ठाण्याचे पथक रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांनी संबंधित युवकाच्या घरी जाऊन पाहणी केली; मात्र तेथे कोणीही आढळून आले नाही. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन पोलिसांनी नातेवाइकांना दिले. मात्र, नातेवाईक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने पोलिस प्रशासनासमोर पेच निर्माण झाला.
सकाळी काढलेला तोडगा सायंकाळी फिस्कटला!
तणाव कमी करण्यासाठी बुधवारी सकाळी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या संबंधित व्यक्ती आणि प्रशासन यांच्यात चर्चा घडवून आणण्यात आली. त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्नही झाला; मात्र हा तोडगा फार काळ टिकला नाही. सायंकाळपर्यंत नातेवाइकांचा रोष कायम राहिल्याने त्यांनी थेट शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या दिला. युवकाच्या मृत्यूमागील परिस्थितीची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीवर नातेवाईक ठाम राहिले. त्यामुळे खामगावातील या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पुढील पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














