Advertisement Advertisement

मोठा अपघात होऊन बळी गेल्यावरच प्रशासन जागं होणार का? खैरव-कोलारा पुलावरील जीवघेणे खड्डे ठरतायत मृत्यूचा सापळा….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): कोट्यवधी रुपये खर्च करून भव्य-दिव्य राज्यमार्ग उभारण्यात आला. या रस्त्यावर वर्षानुवर्षे खड्डे पडणार नाहीत, अशा मोठमोठ्या घोषणा करण्यात आल्या. मात्र, काही दिवसांतच रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेचा पोलखोल झाला असून, राज्यमार्गावर ठिकठिकाणी जीवघेणे खड्डे पडल्याने वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. चिखली तालुक्यातील खैरव-कोलारा शिवारातील हॉटेल बंजारा समोरील पुलावर तर खड्ड्यांचे अक्षरशः साम्राज्य निर्माण झाले आहे.

अजिंठा, बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, वाशिम, यवतमाळ, नागपूर या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा तसेच थेट समृद्धी महामार्गाशी जोडला जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी, एसटी बस, शालेय वाहने आणि अवजड मालवाहू वाहने धावत असतात. पुलावरील मोठमोठे खड्डे चुकविताना वाहनचालकांना समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज घेणे कठीण होत असून, एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विशेष म्हणजे, १२ ऑगस्ट रोजी याच पुलावर भीषण अपघात झाला होता. त्यानंतर १८ सप्टेंबर रोजी पुन्हा याच ठिकाणी थरारक अपघात घडला असून, एका कारचा चक्काचूर झाला. सुदैवाने या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कुटुंबे बालंबाल बचावली. मात्र, हा केवळ नशिबाचा कौल असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. मोठ्या अपघातांसोबतच दररोज दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे घसरून पडत असल्याने किरकोळ अपघात नित्याचे झाले आहेत. अनेकांना दुखापत होऊन उपचारासाठी रुग्णालय गाठावे लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या जीवघेण्या खड्ड्यांबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांनी अनेकदा तोंडी तसेच लेखी स्वरूपात माहिती दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, अद्यापही ठोस उपाययोजना झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याची अशी अवस्था का झाली? कामाचा दर्जा नेमका काय होता? असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत.

दरम्यान, एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुलावरील खड्डे तातडीने आणि कायमस्वरूपी बुजवावेत, रात्रीच्या वेळी अपघात टाळण्यासाठी रिफ्लेक्टर, सुरक्षा फलक व रेडियम पट्टे बसवावेत, तसेच वारंवार सूचना करूनही दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिक ग्रामस्थांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!