डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीत मागील दोन महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने परिसरातील नागरिकांसह शेतकरी हैराण झाले आहेत. मोटारसायकल व घरफोडीच्या घटनांसोबतच शेतकऱ्यांचे पशुधन, कृषीपंप आणि पंपावरील केबल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आतापर्यंत अंदाजे १० शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेल्याची माहिती असून अनेक शेतकऱ्यांचे शेती साहित्यही चोरट्यांनी लंपास केले आहे. मात्र, या घटनांपैकी एकाही चोरीचा छडा लागला नसल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
पिकांवर कोरड्या दुष्काळाचे सावट असताना दूध व्यवसायाच्या माध्यमातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला जात असल्याने त्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. चोरी गेलेल्या म्हशी, गायी किंवा इतर पशुधनाची पुन्हा खरेदी करणे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याची परिस्थिती आहे. त्यातच शेतातील कृषीपंप आणि केबल चोरीला गेल्याने पिकांना पाणी देण्याचा प्रश्न निर्माण झाला असून आधीच वाळत असलेल्या पिकांमुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
डोणगाव येथील विष्णू जनार्दन पळसकर यांच्या दोन म्हशी गेल्या महिन्यात गोठ्यातून चोरीला गेल्या. तसेच पोळ्याच्या पूर्वसंध्येला गजानन साहेबराव पळसकर यांची एक म्हैस चोरीला गेल्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी डोणगाव पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप चोरीचा तपास लागला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, चोरीच्या घटनांवर पोलिसांकडून अपेक्षित कारवाई होत नसल्याची भावना परिसरात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीविरोधात सर्वपक्षीय आंदोलन उभे करण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक तथा शिवसेना नेते अॅड. रामेश्वर पाटील पळसकर यांनी केले आहे. चोरीच्या घटनांचा तातडीने तपास करून चोरट्यांचा बंदोबस्त करावा आणि चोरी गेलेले पशुधन व शेती साहित्य शोधून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.












