नांदुरा(बुलडाणा कव्हरेज न्युज) शहरातील दुर्गा नगर परिसरातून एका २२ वर्षीय तरुणीच्या बेपत्ता होण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली असून, याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद करण्यात आली आहे.
दुर्गा नगर, वार्ड क्रमांक २ येथील रहिवासी नंदकिशोर रामराव देशमुख (वय ४५) हे नगरपालिकेत नोकरीला असून, त्यांची मुलगी चंचल नंदकिशोर देशमुख (वय २२) ही १८ मार्च रोजी दुपारी सुमारे १२.५५ वाजता कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडली. मात्र बराच वेळ लोटल्यानंतरही ती घरी परतली नाही.
कुटुंबीयांनी तत्काळ नातेवाईक, मित्रमैत्रिणी तसेच परिसरातील विविध ठिकाणी तिचा शोध घेतला. परंतु चंचलचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही. अखेर वडील नंदकिशोर देशमुख यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तपास सुरू केला आहे.
चंचल देशमुख हिची उंची अंदाजे ५ फूट ३ इंच असून, रंग गोरा, चेहरा गोल, केस काळे व लांब, डोळे काळे, नाक सरळ आणि बांधा मध्यम आहे. ती घरातून निघताना फिकट जांभळ्या रंगाचा टी-शर्ट आणि ग्रे रंगाची नाईट पॅन्ट परिधान केलेली होती.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार मोहिद्दीन सय्यद हे करत असून, संबंधित तरुणीबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास तात्काळ नांदुरा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.












