शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील गजबजलेल्या आठवडी बाजार परिसरात मंगळवारी (दि. १३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास खुनाची धक्कादायक घटना घडली. दारू पिण्यासाठी पैशांच्या कारणावरून झालेल्या वादातून एका ३१ वर्षीय तरुणाची लाकडी दांड्याने डोक्यात वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक शाहरुख हारुण पटेल (वय ३१) व आरोपी शेख जावेद शेख करीम (वय ३०, रा. काँग्रेस नगर, शेगाव) यांच्यात दारूच्या पैशांवरून वाद झाला होता. हा वाद वाढत गेल्यानंतर संतापलेल्या शेख जावेदने जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून शाहरुखच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. गंभीर मार लागल्याने शाहरुख पटेल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
ही घटना बजरंग बली मंदिराजवळ, आठवडी बाजार परिसरात घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
याप्रकरणी गजानन राजू तायडे (वय ४०, रा. धनगरनगर, शेगाव) यांनी १४ मे रोजी सकाळी शेगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस निरीक्षक निमीष मेहत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी शेख जावेद शेख करीम याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.












