मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): वैद्यकीय क्षेत्राला हादरवून सोडणारी घटना मेहकर तालुक्यातील गोहोगाव हाडे येथे घडली. देऊळगाव साकर्शा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मांडवा फॉरेस्ट उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ. संदीप प्रकाशराव हाडे (वय ३७) यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. या घटनेने आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
डॉ. हाडे हे काही महिन्यांपूर्वी बाहेर जिल्ह्यातून बदली होऊन मांडवा फॉरेस्ट आरोग्य उपकेंद्रात रुजू झाले होते. ते गेल्या चार महिन्यांपासून येथे समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत होते. दरम्यान, एनक्यूएएस (नॅशनल क्वॉलिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड) समिती उपकेंद्राचे मूल्यांकन करण्यासाठी येणार होती. त्यामुळे मूल्यांकनाची तयारी करण्याची जबाबदारी डॉ. हाडे यांच्यावर होती.
मनुष्यबळ, साधनसामुग्री आणि मूलभूत सुविधांचा अभाव असताना अल्प कालावधीत मूल्यांकनाची तयारी करण्यासाठी वरिष्ठांकडून दबाव होता, असा आरोप महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केला आहे. याच कामाच्या ताणामुळे डॉ. हाडे मानसिक दबावाखाली होते, असा संघटनेचा दावा आहे.
डॉ. हाडे यांच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार त्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली होती आणि कोणताही कौटुंबिक कलह नव्हता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागे नेमके कारण काय, तसेच त्यांच्यावर कोणत्या स्वरूपाचा प्रशासकीय दबाव होता, याची सखोल चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
ही घटना केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जिल्ह्यात आणि मेहकर विधानसभा मतदारसंघात घडल्याने या प्रकरणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेने केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांच्याकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे.
राजीनामा घेऊन आले होते डॉ. हाडे….
डॉ. संदीप हाडे हे काही दिवसांपूर्वी राजीनामा देण्यासाठी आपल्याकडे आले होते. त्यावेळी त्यांनी मानसिक स्वास्थ्य सध्या ठीक नसल्याचे सांगितले होते. त्यांची समजूत काढून कामाचा किंवा इतर कोणताही ताण घेऊ नका, असे सांगितल्याची माहिती देऊळगाव साकर्शा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिकेत राठोड यांनी दिली.
बाहेर जिल्ह्यातील समितीकडून चौकशीचे आश्वासन…
घटनेनंतर १७ ऑगस्ट रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजित मंडाले यांनी मेहकर येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रकरणाची फास्ट ट्रॅक चौकशी करण्याची मागणी केली. बाहेर जिल्ह्यातील चौकशी समितीमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
चार ते पाच दिवसांत न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. तसेच आमदार सिद्धार्थ खरात यांनाही निवेदन देऊन या प्रकरणात न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.
आता डॉ. संदीप हाडे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, एनक्यूएएस मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या आणि त्यांच्यावर प्रशासकीय दबाव होता का, याची चौकशी होण्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














