मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील लोणीगवळी-घाटबोरी सिमेंट रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू असताना मागील चार महिन्यांपासून संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट सोडून दिल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. रखडलेल्या आणि धोकादायक बनलेल्या रस्त्याविरोधात घाटबोरी-मेहकर मार्गावर ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते अंकुश श्रीराम राठोड, राजू तुकाराम कुसळकर, शंकर श्यामराव गिरी, सुभाष मिरे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. काही आंदोलकांनी कमरेला कडुनिंबाच्या डहाळ्या बांधून अर्धनग्न पद्धतीने आंदोलन करत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त केला.
ग्रामस्थांच्या माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अमडापूर, लोणीगवळी, घाटबोरी, विश्वी आणि बेलगाव या गावांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या सिमेंट रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र संबंधित ठेकेदाराने अचानक काम बंद केल्याने संपूर्ण प्रकल्प रखडला आहे.
सध्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली असून ठिकठिकाणी अर्धवट खोदकाम, साचलेली खडी आणि अपूर्ण रस्त्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर दोन वाहने समोरासमोर आल्यास वाहन काढणेही कठीण होत असल्याने अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
“सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याच्या कामाकडे लक्ष द्यावे, अन्यथा मेहकर हायवेवर तीव्र रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अंकुश राठोड आणि राजू कुसळकर यांनी दिला.
दरम्यान, या आंदोलनामुळे परिसरातील नागरिकांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी केली आहे.















