Advertisement Advertisement

शेतातील धुऱ्याच्या वादातून दोन गट आमनेसामने; हिवरखेड पोलिसांत परस्परविरोधी गुन्हे दाखल…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिवरखेड येथे शेतातील धुरे व शेणखत टाकण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण होऊन परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंकडून गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दादाराव गोविंदा पारखे (वय ५५, रा. हिवरखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ८ जून रोजी सकाळी सुमारे ५.३० वाजता ते शेतात काम करत असताना सोमा पुंजाजी शिंगाडे, मंगेश सोमा शिंगाडे आणि गजानन सोमा शिंगाडे हे तेथे आले. शेतात शेणखत का पांगवले आणि धुऱ्याच्या वादाच्या कारणावरून आरोपींनी शिवीगाळ करत काठी व कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून हिवरखेड पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ व ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या घटनेत दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोमा पुंजाजी शिंगाडे (वय ७०, रा. हिवरखेड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शेताच्या धुऱ्यावरील लिंबाचे झाड तोडण्याच्या कारणावरून दादाराव गोविंदा पारखे व गोविंदा वामन पारखे यांनी अश्लील शिवीगाळ केली, धक्काबुक्की करत मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५ (२), ३५१ (२) व ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शेताच्या धुऱ्याच्या वादातून सुरू झालेल्या या प्रकरणामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास हिवरखेड पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!