सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज) : शहरातील तायडे गल्ली परिसरातून माजी नगराध्यक्ष सतीश तायडे यांचे बंधू तथा मेडिकल व्यावसायिक राजेश भागुजी तायडे यांची अंदाजे अडीच लाख रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी घरासमोरून लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजेश भागुजी तायडे यांनी त्यांची बुलेट मोटारसायकल (क्र. MH 21 BB 9909) नेहमीप्रमाणे घरासमोर पार्क केली होती. ३० मेच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ही मोटारसायकल चोरून नेली. सकाळी वाहन जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच सिंदखेडराजा पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. ठाणेदार आशिष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी श्रावण डोंगरे, विकास राऊत तसेच अन्य पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक चोरट्यांचा शोध घेण्यासाठी कामाला लागले आहे.
चोरीचा उलगडा करण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरातील गजबजलेल्या आणि वर्दळीच्या भागातून थेट घरासमोर उभी असलेली मोटारसायकल चोरीला गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील सुरक्षाव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.












