Advertisement Advertisement

नववर्षाच्या दिवशीच आभाळ फुटलं, शेतकऱ्यांच्या पिकांचं वाटोळं! मुलासमोर बाप कोसळला, हृदयविकारानं घेतला जीव….

डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मराठी नववर्षाच्या दिवशी डोणगाव परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांसाठी काळाचा घाला ठरला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले असून गहू, हरभरा, मका, कांदा यांसह इतर पिके आडवी झाली आहेत.

१९ मार्च रोजी सकाळी सुमारे सात वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. जोरदार वादळी वारा आणि विजांचा कडकडाट यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. शेतात सोंगून ठेवलेला गहू, हरभरा, चिया, हळद वाचवण्यासाठी शेतकरी सुडी झाकण्यासाठी धाव घेत होते.

दरम्यान, डोणगाव येथील एकनाथ शिवराम आखाडे (वय ५५) हे आपल्या मुलासह हरभऱ्याची सुडी झाकण्यासाठी शेतात गेले होते. याचवेळी विजांचा कडकडाट सुरू असताना शेताजवळच वीज पडल्याची घटना घडली. या भीषण परिस्थितीत एकनाथ आखाडे यांना अचानक भोवळ येऊन ते जमिनीवर कोसळले. त्यांना घाम फुटल्याने तातडीने खासगी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी धडपड करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलासमोरच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळले असून नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत देण्याची मागणी होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!