सिंदखेडराजा (बुलढाणा कव्हरेज न्यूज): ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराच्या प्रलंबित विकासकामांसंदर्भात मुंबई येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रलंबित प्रस्ताव आणि निवेदने उपमुख्यमंत्र्यांकडे सादर केली. शहराच्या विकासासाठी शासन स्तरावर निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि प्रलंबित प्रश्न लवकर मार्गी लावले जातील, असे आश्वासन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.
बैठकीदरम्यान नगराध्यक्ष सौरभ तायडे यांनी शहरातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी सुमारे ४२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे सविस्तर निवेदन सादर केले. यामध्ये शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या बांधकामासाठी २० कोटी रुपये, नगर परिषद प्रशासकीय इमारतीसाठी १० कोटी रुपये, ऐतिहासिक चांदणी तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५ कोटी रुपये तसेच इतर विकासकामांचा समावेश आहे.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचे जन्मस्थान असल्याने सिंदखेडराजा येथे राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक आणि भाविक भेट देतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण शहर सीसीटीव्ही निगराणीखाली आणण्याचा प्रस्तावही बैठकीत मांडण्यात आला. यासाठी ३.९१ कोटी रुपयांचे सीसीटीव्ही नेटवर्क आणि चार वर्षांच्या देखभालीसाठी १.३२ कोटी रुपये, असा एकूण ५.२३ कोटी रुपयांचा स्वतंत्र प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.
याशिवाय, २०१३ मध्ये मंजूर झालेला ३११ कोटी रुपयांचा विकास आराखडा वाढत्या खर्चामुळे अपुरा ठरत असल्याने तो सुधारित करून ६०० कोटी रुपयांचा स्वतंत्र विकास आराखडा मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे संकेत दिल्याची माहिती देण्यात आली.
या बैठकीस संजय गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतीश काळे, युवा नेते दीपक ठाकरे तसेच पिंटू शिंगणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.












