Advertisement Advertisement

देऊळगाव राजात चोरट्यांचा धुमाकूळ; घरफोडी, टायर दुकान फोडून सुमारे १ लाखांचा ऐवज लंपास, बँकेतही चोरीचा प्रयत्न…

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्यूज): देऊळगाव राजा शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका घरात घरफोडी, व्यावसायिक आस्थापनात चोरी आणि बँकेत चोरीचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या एका रात्रीत घडलेल्या या सलग घटनांमुळे शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अपराध क्रमांक ३०८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 331(4) व 305(A) अंतर्गत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगणे नगर येथील रहिवासी गजानन माधवराव बुधवत (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ७ जुलै रोजी सायंकाळी ५.३० ते ८ जुलै रोजी सकाळी ८.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून सुमारे ३ ग्रॅम सोन्याची अंगठी, ४ ग्रॅम सोन्याचे कानातील दागिने, ३ ग्रॅम वजनाची दोन सोन्याची फुले तसेच २५ हजार रुपयांची रोकड असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.

याच रात्री जालना रोडवरील सिंदखेड राजा चौफुली परिसरातील ‘शिवांश टायर्स’ या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवलेली २५ हजार रुपयांची रोकड लंपास करण्यात आली. या दोन्ही चोरीच्या घटनांमध्ये मिळून सुमारे १ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळविल्याची नोंद आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरातील बंधन बँकेतही चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकारामुळे शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्व घटना एकाच टोळीने घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि संशयितांच्या हालचालींचा मागोवा घेत पोलीस तपासाची चक्रे वेगाने फिरवत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मिंड करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!