खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शहरातील चिखली रोडवरील स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर खासगी बाजार समितीच्या मागील नाल्यात सुरू असलेल्या विहिरीच्या बांधकामादरम्यान मंगळवारी (१६ जून) सकाळी भीषण दुर्घटना घडली. बांधकामासाठी टाकण्यात आलेला फर्मा अचानक घसरल्याने भगवान महादेव दांदळे (वय ३२, रा. अटाळी) हे मजूर विहिरीत कोसळले. त्यांच्या अंगावर फर्म्याचा मलबा व माती कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
मात्र विहिरीत तब्बल ३० ते ४० फूट पाणी असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम अत्यंत कठीण झाले. पाणी उपसण्यासाठी आवश्यक यंत्रणा वेळेत उपलब्ध न झाल्याने बचावकार्य रखडले. या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यांनी प्रथम शिवाजीनगर परिसरात आंदोलन करत निषेध व्यक्त केला आणि त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात ठिय्या देत प्रशासनाला धारेवर धरले.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे ९ वाजता गजानन भाकरे, मोहन मुंडे, महादेव बिल्लेवार, प्रदीप बेलदार, नझूलसिंग काळे आणि भगवान दांदळे असे सहा मजूर नेहमीप्रमाणे कामावर होते. विहिरीच्या बांधकामासाठी फर्मा टाकून माती भरण्याचे काम सुरू असताना अचानक फर्मा घसरला आणि भगवान दांदळे विहिरीत पडले. त्यांच्यावर माती व फर्म्याचा मलबा कोसळल्याने ते ढिगाऱ्याखाली दबले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र पाणी उपसण्यासाठी आवश्यक क्षमतेची यंत्रणा उपलब्ध नसल्याने बचावकार्य सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे अटाळी गावातील ग्रामस्थांनी शहर पोलीस ठाणे गाठून ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे ॲड. अमोल अंधारे आणि राजेंद्र बघे उपस्थित होते.
त्यानंतर प्रशासनाने तातडीने २० एचपीची विद्युत मोटार आणि मोठे जनरेटर घटनास्थळी पाठविले. ठाणेदार रामकृष्ण पवार स्वतः घटनास्थळी पोहोचले. तसेच तहसीलदार सुनील पाटील, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. दुपारी सुमारे ४.३० वाजता विहिरीतील पाणी उपसण्याचे काम सुरू झाले.
अखेर रात्री सुमारे ११ वाजता, दुर्घटनेनंतर तब्बल १३ तासांनी भगवान दांदळे यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह खामगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, बांधकामस्थळी सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.















