बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याच्या वाट्याला पहिल्यांदाच आलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद धोक्यात येते की काय, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानानंतर पक्षांतर्गत नाराजी उफाळून आली असून अनेक जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांवरून पक्षात वाद निर्माण झाला आहे.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर संघटनात्मक बदलांना वेग आला होता. राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळख असलेल्या सपकाळ यांनी यापूर्वी राजीव गांधी पंचायतराज समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे. मात्र प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या कार्यशैलीवर आता पक्षातीलच काही नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
काँग्रेसमध्ये सध्या संघटनात्मक फेरबदलांचे वारे वाहत असून तालुकाध्यक्ष, जिल्हास्तरीय पदाधिकारी तसेच सोशल मीडिया संघटनांच्या नियुक्त्या संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत अपेक्षित पारदर्शकता ठेवली गेली नसल्याचा आरोप सपकाळ विरोधी गटाकडून करण्यात येत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष निवडीवरून तीव्र नाराजी व्यक्त होत असल्याची चर्चा असून काही वरिष्ठ नेत्यांनीही या प्रक्रियेवर आक्षेप घेतल्याचे समजते.
याशिवाय सपकाळ यांची कार्यपद्धती एकतर्फी असून ते वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेत नसल्याचा आरोप नाराज गटाकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ ८ जून रोजी दिल्लीत जाऊन पक्षाच्या हायकमांडची भेट घेणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळात चर्चिली जात आहे. या भेटीत संघटन सृजन अभियानातील कथित त्रुटींसह प्रदेशाध्यक्षांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी मांडल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या घडामोडींमुळे राज्य काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले असून हर्षवर्धन सपकाळ यांच्यावरील नेतृत्वाचा विश्वास कायम राहणार की संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होणार, याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांसह राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
















