हिवरा आश्रम/मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : आर्थिक अडचणीतून सुटका करण्यासाठी एका तरुणाने स्वतःच्या अपहरणाचा बनाव रचत वडिलांकडे तब्बल ४० तोळे सोन्याची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे या कटाचा सूत्रधार मुलगाच निघाला असून त्याने आपल्या मित्राच्या मदतीने हे संपूर्ण नाट्य रचल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. मेहकर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत या प्रकरणाचा पर्दाफाश केला.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रायपूर ता. मेहकर येथील जनार्धन काळे यांनी ६ मे रोजी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचा मुलगा चेतन जनार्धन काळे (वय १९) हा बी.एस्सी.चा पेपर देण्यासाठी छगन भुजबळ महाविद्यालय, ब्रम्हपुरी फाटा, मेहकर येथे गेला होता. मात्र तो घरी परतला नाही.
दरम्यान, दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास जनार्धन काळे यांच्या मोबाईलवर चेतनच्या मोबाईलवरून एक व्हिडीओ आणि संदेश प्राप्त झाला. त्या व्हिडीओमध्ये चेतनला दोरीने बांधलेले दिसत होते. तसेच, “तुमचा मुलगा आमच्या ताब्यात आहे. त्याला जिवंत पाहायचे असेल तर २ तासांच्या आत शेगाव रेल्वे स्टेशन येथे ४० तोळे सोने घेऊन एकट्याने या,” अशी धमकी देण्यात आली होती.
या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मेहकर पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवली. पोलिसांनी चेतनचे नातेवाईक, मित्र, शिक्षक यांची चौकशी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे विविध पथके तयार करून वेगवेगळ्या जिल्ह्यांत रवाना करण्यात आली.
तपासादरम्यान पोलिसांनी चेतन काळे याला नाशिक जिल्ह्यातील लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाकड परिसरातील एका शेतातून ताब्यात घेतले. त्याच्यासोबत त्याचा मित्र विवेक सखाराम काकडे (वय २६, रा. पोखरी फाटा, हिवरा आश्रम ता. मेहकर, सध्या रा. नाशिक) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
दोघांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, आर्थिक अडचणीमुळे अनेक दिवसांपासून बनावट अपहरणाचा कट रचल्याची कबुली त्यांनी दिली. स्वतःच्या अपहरणाचा बनाव करून वडिलांकडून सोन्याची खंडणी उकळण्याचा त्यांचा डाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला.
या प्रकरणात आणखी काही साथीदारांचा सहभाग असण्याची शक्यता असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक अवचार करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे आणि पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.













