सिंदखेडराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथून देऊळगाव कोळकडे जाणारी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक मोती तलावाजवळ भीषण अपघातातून थोडक्यात बचावली. समोरून येणाऱ्या भरधाव चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात बस रस्त्याखाली गेली, मात्र चालकाच्या प्रसंगावधानामुळे बस पुलाच्या कठड्यावर अडकून राहिली. त्यामुळे बस नाल्यात कोसळण्यापासून बचावली आणि मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच १४ बीटी ४१९४ क्रमांकाची एसटी बस गुरुवारी रात्री सुमारे १० वाजेच्या दरम्यान २० प्रवाशांना घेऊन पिंपरी-चिंचवडहून देऊळगाव कोळकडे जात होती. सिंदखेड राजा येथील मोती तलावाजवळील धोकादायक वळणावर बस आली असता समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका चारचाकी वाहनाला वाचवण्यासाठी चालक गणेश धोटे यांनी बस बाजूला घेतली. मात्र रस्त्यालगत मोठा नाला असल्याने बस थेट खाली जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
अत्यंत धाडस आणि समयसूचकता दाखवत चालक गणेश धोटे यांनी बसवरील नियंत्रण कायम ठेवले. त्यामुळे बस नाल्यात कोसळण्याऐवजी पुलाच्या कठड्याला जाऊन अडकली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून सर्व २० प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे युवा नेते विजय तायडे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच एसटी महामंडळाचे सिंदखेड राजा येथील नियंत्रक चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून प्रवाशांच्या पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून चालक गणेश धोटे व वाहक राहुल कोरडे यांच्याशी चर्चा करण्यात आली. नाल्याच्या काठावर अडकलेली बस बाहेर काढण्यासाठी क्रेन आणि अन्य यंत्रणेची मदत घेण्यात येत आहे.
रात्रीच्या वेळी घडलेला हा अपघात अतिशय भीषण ठरू शकला असता. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे २० प्रवाशांचे प्राण वाचल्याने सर्वत्र चालक गणेश धोटे यांचे कौतुक होत आहे.














