मेहकर(बुलडाणा कव्हरेज न्युज): मेहकर तालुक्यातील वडगाव तेजन टोल नाक्यावर १८ जून रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास भरधाव वेगातील आयशर ट्रक दुभाजकावर चढून उलटल्याची घटना घडली. या भीषण अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-२०-डीई-७५७५ क्रमांकाचा आयशर रिसोड येथून जळगावच्या दिशेने जात होता. यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांच्या प्रखर प्रकाशामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे आयशर थेट दुभाजकावर चढून उलटला.
अपघातात आयशरचे इंजिन फुटल्याने वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. मात्र, सुदैवाने या अपघातात चालकासह कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही किंवा जीवितहानी झाली नाही.














