Advertisement Advertisement

चिखलीत मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ! सहा ठिकाणी घरफोड्या करून रोकड-सोन्यावर डल्ला;हातात हत्यारे, तोंडाला रुमाल बांधलेले चार संशयित सीसीटीव्हीत कैद….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील शाहूनगर तसेच पंचमुखी महादेव मंदिर परिसरात १४ सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः धुमाकूळ घातला. एकापाठोपाठ एक अशा तब्बल सहा ठिकाणी घरफोड्या करून चोरट्यांनी रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या चोरट्यांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या असून तोंडाला रुमाल बांधलेले आणि हातात हत्यारे असलेले चार संशयित स्पष्टपणे दिसत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शाहूनगर आणि पंचमुखी महादेव मंदिर परिसरातील अनेक घरांना लक्ष्य केले. इंगळे सर, अनिल सोनुने, संजय अंभोरे आणि माधव कुंडलिक गायकवाड यांच्या घरांमध्ये चोरी अथवा चोरीचा प्रयत्न करण्यात आला. सुधाकर काळे यांच्या गोडाऊनलाही चोरट्यांनी लक्ष्य केले. तसेच शाहूनगरातील तिरमारे यांच्या घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तेथून चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.

घरातील व्यक्ती झोपेत असतानाच घरफोडी….

पंचमुखी महादेव मंदिराजवळ राहणारे माधव कुंडलिक गायकवाड यांच्या घरातही चोरट्यांनी प्रवेश केला. १४ सप्टेंबर रोजी रात्री १ ते २.४५ वाजेदरम्यान चोरट्यांनी मागील खोलीच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केल्याची माहिती आहे. घरातील व्यक्ती झोपलेल्या असतानाच चोरट्यांनी बेडरूमचा दरवाजा बाहेरून लावून घेतला आणि लोखंडी कपाटाचे दोन्ही लॉक तोडले.

कपाटातून सोन्याचे मंगळसूत्र पोत, सुमारे ७ ग्रॅम वजनाचे व अंदाजे ३५ हजार रुपये किंमतीचे, ३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे फूल तसेच ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा दागिन्यांचा ऐवज आणि सुमारे १ लाख २५ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती फिर्यादीत नमूद करण्यात आली आहे. आवाज झाल्याने गायकवाड यांना जाग आली; मात्र अवघ्या पाच ते सात मिनिटांत चोरट्यांनी तेथून पलायन केल्याचे सांगण्यात आले.

चार संशयित सीसीटीव्हीत कैद

या घरफोड्यांमधील संशयितांच्या हालचाली परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाल्या आहेत. फुटेजमध्ये चार संशयित तोंडाला रुमाल बांधून परिसरात फिरताना आणि हातात हत्यारे असल्याचे दिसून येत आहे. काही फुटेजमध्ये संशयित घराच्या भिंतीवरून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहेत. काही संशयितांनी अंगावरील बहुतांश कपडे काढलेले असून केवळ अंतर्वस्त्र आणि तोंडाला रुमाल बांधलेल्या अवस्थेत ते दिसत आहेत. त्यांच्या अंगावर तेल लावलेले असावे, असा प्रथमदर्शनी अंदाज सीसीटीव्ही फुटेजवरून व्यक्त करण्यात येत आहे.

या प्रकरणी माधव कुंडलिक गायकवाड यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ३०५ व ३३१(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वानपथक व न्यायवैद्यकीय पथकाची पाहणी

घरफोडीच्या घटनांची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासासाठी श्वानपथक तसेच न्यायवैद्यकीय पथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरील ठसे व इतर पुरावे गोळा करण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद भागवतकर करीत आहेत.

दरम्यान, पंचमुखी महादेव मंदिर परिसरात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संतोष परीहार यांनी केली आहे. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!