मोताळा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातील सामाईक धुरा कोरल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद चांगलाच पेटल्याची घटना मोताळा तालुक्यातील टाकळी घडेकर येथे घडली. यामध्ये एका ५७ वर्षीय महिलेला धक्काबुक्की व लोटपाट करण्यात आली, तर आईला लोटपाट का केली, अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या तिच्या मुलाला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळी घडेकर येथील कमल कोंडराम बाम्हदे (वय ५७) आणि सुरेश बाम्हदे यांची शेती एकमेकांना लागून आहे. शेतातील सामाईक धुरा कोरल्याच्या कारणावरून कमल बाम्हदे यांनी सीमा सुरेश बाम्हदे यांना जाब विचारला. त्यावेळी शिवीगाळ झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकाराचा राग मनात धरून ९ व १० सप्टेंबर रोजी सुरेश बाम्हदे व जितेंद्र बाम्हदे हे कमल बाम्हदे यांच्या घरी गेले. ‘माझ्या पत्नीला शिवीगाळ का केली?’ असा जाब विचारत त्यांनी कमल बाम्हदे यांच्याशी धक्काबुक्की व लोटपाट केल्याचा आरोप आहे. त्यानंतर कमल बाम्हदे यांचा मुलगा घरी आल्यानंतर आईने त्याला घडलेला प्रकार सांगितला.
आईला लोटपाट का केली, अशी विचारणा करण्यासाठी मुलगा संबंधितांकडे गेला असता सुरेश बाम्हदे, जितेंद्र बाम्हदे आणि प्रवीण बाम्हदे या तिघांनी मिळून त्याला लाठ्या-काठ्यांनी पाठीवर व पोटावर मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेप्रकरणी कमल बाम्हदे यांच्या फिर्यादीवरून धामणगाव बढे पोलिसांनी सुरेश बाम्हदे, जितेंद्र बाम्हदे, प्रवीण बाम्हदे आणि सीमा सुरेश बाम्हदे (सर्व रा. टाकळी घडेकर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), ३५२ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकाँ. गजानन भराड करीत आहेत.












