शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज)शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येऊलखेड येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येऊलखेड येथील आरोपी भगवान उत्तम खंडारे (वय अंदाजे ५५) याने १ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पीडित मुलीला पाच रुपये देण्याचे आमिष दाखवून घरात बोलावले. त्यानंतर तिच्याशी अयोग्य वर्तन करत विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने ४ एप्रिल रोजी आपल्या आईला हा प्रकार सांगितला. त्यानंतर फिर्यादीने आरोपीला जाब विचारला असता त्याने चूक झाल्याची कबुली दिल्याचेही समोर आले आहे.
अखेर ५ एप्रिल रोजी फिर्यादी, तिचे पती व पीडिता यांनी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अप क्रमांक ११८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४ तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण कायदा (POCSO) २०१२ च्या कलम ८ व १२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













