बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): लोकसभा निवडणुकीनंतर उबाठा शिवसेनेत प्रवेश केलेले संदीप शेळके यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी आपला राजीनामा जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्याकडे सुपूर्द केला असून तो स्वीकारण्यात आल्याची माहिती बुधवंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
“वन बुलडाणा मिशन”च्या माध्यमातून बुलढाणा लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाचा नारा देत संदीप शेळके यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला होता. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन मांडत विकासाच्या राजकारणावर भर देणारा चेहरा म्हणून त्यांनी जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली. लोकसभेत अपेक्षित यश मिळाले नसले तरी विकासाच्या मुद्द्यावर बोलणारा नेता म्हणून त्यांची चर्चा झाली होती.
निवडणुकीनंतर त्यांनी उबाठा शिवसेनेत प्रवेश घेतला होता. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर त्यांनी पक्ष संघटनेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. मात्र अचानक दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांच्याकडे दिलेल्या राजीनामा पत्रात शेळके यांनी कौटुंबिक कारणांमुळे पक्ष संघटनेला अपेक्षित वेळ देता येत नसल्याचे नमूद केले आहे. मात्र त्यांच्या राजीनाम्यामागे इतर राजकीय कारणे असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे.
काँग्रेसमध्ये जाणार का शेळके?
संदीप शेळके लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागल्या आहेत. जिल्ह्यात काँग्रेस संघटनेला नवसंजीवनी देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ संघटनेत बदल करण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर नव्या आणि दमदार नेतृत्वाच्या शोधात असलेल्या काँग्रेसकडून शेळकेंना प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे..!
त्यामुळे येत्या काळात काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची धुरा संदीप शेळके यांच्या खांद्यावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे..? मात्र राजकारणात पुढे काय घडेल हे सांगणे कठीण असल्याने सर्वांच्या नजरा आता शेळकेंच्या पुढील निर्णयाकडे लागल्या आहेत.
















