लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज) : खापरखेड लाड शिवारात वैध रॉयल्टी अथवा वाहतूक परवाना नसताना वाळूची वाहतूक करणाऱ्या सहा टिप्परवर महसूल पथकाने कारवाई केली. प्रत्येक टिप्परमध्ये सहा ब्रास याप्रमाणे एकूण ३६ ब्रास वाळू आढळून आली. महसूल पथकाने सहाही वाहने आणि वाळू असा एकूण १ कोटी ९२ लाख १६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनमालक व चालकांविरुद्ध बिबी पोलिस ठाण्यात चोरी व गौण खनिजाच्या नियमबाह्य वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायब एसडीओ प्रशांत सानप व तहसीलदार भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार मयूर इप्पर, मंडळ अधिकारी सानप, ग्राम महसूल अधिकारी निलेश भुजंगराव जाधव आणि महसूल पथक ९ सप्टेंबर रोजी साठ्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी संशयास्पदरीत्या वाळू वाहतूक करणारे सहा टिप्पर पथकाच्या निदर्शनास आले. पंचांसमक्ष वाहनांची तपासणी केली असता प्रत्येक टिप्परमध्ये अंदाजे सहा ब्रास वाळू असल्याचे आढळले.
महसूल विभागाच्या नोंदीनुसार प्रत्येक वाहनातील वाळूची किंमत ३६ हजार रुपये, तर ३६ ब्रास वाळूची एकूण किंमत २ लाख १६ हजार रुपये आहे. जप्त करण्यात आलेल्या वाहनांचे क्रमांक एमएच-२८ बीबी-२१३०, बीबी-६०४२, बीए-६०४२, बीएक्स-७०९०, सीएफ-०१७९ आणि बीबी-९९२५ असे आहेत. यातील शेवटच्या वाहनाचा मालक डॉ. केशव अवचार आणि चालक पंकज भालेराव असल्याची नोंद आहे.
दरम्यान, संबंधित वाळू देवी तुळजाई प्रायव्हेट लिमिटेडच्या साठ्यातून भरल्याचे चालकांनी सांगितल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र या वाळूच्या साठ्याची अधिकृत नोंद, प्रत्यक्ष उपलब्धता तसेच वाहतूक परवान्यांची वैधता याबाबतची पडताळणी पोलिस व महसूल विभागाच्या तपासात होणार आहे. ग्राम महसूल अधिकारी निलेश जाधव यांच्या तक्रारीवरून ९ सप्टेंबर रोजी रात्री बिबी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
विशेष म्हणजे, घरकुल लाभार्थ्यांसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या मोफत वाळूच्या पुरवठ्याशी या कारवाईतील वाळूचा संबंध आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे संबंधित अधिकृत वाळू साठा, त्यातून झालेली वाहतूक आणि प्रत्यक्ष वितरण यांचा ताळमेळ तपासातून समोर येणार आहे.














