Advertisement Advertisement

सोयाबीनचे कुटार अनुदान देऊन खरेदी करा; पशुधनासाठी साठवणूक करा!चारा छावण्यांऐवजी गावपातळीवर शेतकऱ्यांकडे जबाबदारी द्या; अनुदान थेट खात्यावर जमा करा! सरनाईक, कणखर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

चिखली(बुलडाणा कव्हरेज न्युज): यंदा कोरड्या दुष्काळामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असले, तरी सोयाबीनचे कुटार मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र, अनेक शेतकऱ्यांकडे पशुधन नसल्याने हे कुटार शेतातच सडते किंवा जाळून टाकले जाते. दुसरीकडे, आगामी काळात चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने उपलब्ध कुटाराचा योग्य वापर करण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक व शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास कणखर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

शासनाने पशुधन नसलेल्या शेतकऱ्यांकडील कुटार अनुदानासह योग्य दराने खरेदी करावे, त्यासाठी प्रतिक्विंटल दर निश्चित करावा आणि गावपातळीवर कुटार संकलन व साठवणूक केंद्रे उभारावीत. चारा टंचाईच्या काळात हे कुटार पशुधन असलेल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यामुळे कुटाराचा अपव्यय थांबून कुटार उपलब्ध करून देणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला मिळेल, तर पशुपालकांनाही चारा टंचाईत दिलासा मिळेल.

संस्थांऐवजी गावपातळीवर शेतकऱ्यांकडे चारा व्यवस्थापनाची जबाबदारी द्या!

यापूर्वी चारा छावण्यांवर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च झाले; मात्र या व्यवस्थेचा अपेक्षित लाभ शेतकऱ्यांपेक्षा छावण्या चालविणाऱ्या संस्थांना अधिक होतो, अशी भूमिका सरनाईक व कणखर यांनी मांडली. त्यामुळे चारा छावण्यांची जबाबदारी संस्थांकडे देण्याऐवजी गावागावांत शेतकऱ्यांच्या सहभागातून चारा संकलन, साठवणूक व वितरण व्यवस्था उभारावी. या व्यवस्थेसाठीचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करावे, अशी मागणी त्यांनी केली.

चारा छावण्यांवरील खर्चाऐवजी उपलब्ध कुटाराचा नियोजनबद्ध वापर केल्यास शासनाच्या निधीची बचत होईल. तसेच पात्र पशुपालकांना चारा अनुदान थेट खात्यावर देण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यासंदर्भात चिखली तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे मागणी सादर करण्यात आली असून, कुटाराचा नमुनाही शासनाकडे देण्यात आला. पिकांचे नुकसान झाल्यानंतर आता चाऱ्याअभावी पशुधनाचे नुकसान होऊ नये, यासाठी शासनाने कुटार खरेदी, साठवणूक आणि थेट अनुदान वितरणाबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी सरनाईक व कणखर यांनी केली आहे.

यावेळी उद्धव थुटे पाटील, नितीन राजपूत, अरुण नेमाने, गजानन पंडित, मुरलीधर येवले, गजानन कुटे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!