Advertisement Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान अंबादास वाघ यांना वीरमरण! सोयगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना जवान अंबादास वाघ यांना वीरमरण! सोयगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; ‘अमर रहे’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला!

मासरूळ (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा तालुक्यातील सोयगाव येथील जवान अंबादास पांडुरंग वाघ (वय ४५) यांचे जम्मू-काश्मीर येथे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारी रात्री सुमारे दोन वाजताच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेल्या जवानाच्या निधनाची बातमी सोयगावात धडकताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. या दुःखद घटनेने ग्रामस्थ, नातेवाईक, मित्रपरिवार आणि आप्तेष्टांना मोठा धक्का बसला.

सोयगावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार…..

जवान अंबादास वाघ यांचे पार्थिव ७ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या मूळ गावी सोयगाव येथे आणण्यात आले. दुपारी १२.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या लाडक्या जवानाला अखेरचा निरोप दिला. अंत्यसंस्कारावेळी आमदार श्वेताताई महाले, जम्मू-काश्मीरचे शासकीय अधिकारी, धाड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजिनाथ मोरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याशिवाय राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक, सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील मान्यवरांनीही उपस्थित राहून जवानाला श्रद्धांजली अर्पण केली.

‘अमर रहे, अमर रहे, अंबादास वाघ अमर रहे!’

अंत्यसंस्कारावेळी ‘अमर रहे, अमर रहे, अंबादास वाघ अमर रहे!’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. देशाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावणाऱ्या जवानाला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले. भावपूर्ण वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. जवान अंबादास वाघ यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, एक मुलगा आणि दोन भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गाव त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाले आहे.

सोयगावने गमावला देशसेवेसाठी समर्पित जवान….

देशसेवेसाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या जवान अंबादास वाघ यांच्या निधनाने सोयगावने एक कर्तव्यनिष्ठ जवान गमावला आहे. देशाच्या सेवेत असताना त्यांचे झालेले निधन ग्रामस्थांसाठी अत्यंत वेदनादायी ठरले. त्यांच्या देशसेवेची आठवण कायम मनात राहील, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. शासकीय इतमामात दिलेला अखेरचा निरोप आणि ‘अमर रहे’च्या घोषणांतून गावकऱ्यांनी या वीर जवानाप्रती आपला आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!