बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): बुलढाणा शहरातील खामगाव रोडवरील सुंदरखेड परिसरात रॉयल एनफिल्ड कंपनीच्या दुचाकींच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. या आगीत गोदामातील तीन बुलेट दुचाकी जळून खाक झाल्या असून, इतर काही बुलेटलाही आगीची झळ बसली आहे.
गोदामातून धूर व आग दिसून येताच घटनेची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली. माहिती मिळताच नगर परिषदेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.
या आगीत तीन बुलेट पूर्णपणे जळाल्या असून, गोदामातील इतर दुचाकी तसेच साहित्याचेही नुकसान झाले आहे. आगीमुळे गोदामातील मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेत सुमारे १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अंतिम आकडा तपासानंतर स्पष्ट होणार आहे.














