Advertisement Advertisement

CRIME INSIDE STORY:सात-आठ एकर जमिनीच्या वादाची चर्चा, पण सत्य अजून गुलदस्त्यात! मोटारीच्या वायरवरून भावाभावांत वाद झाल्याची माहिती! काही तासांतच आई, भाऊ अन् पुतण्याचा दुर्दैवी अंत! सोमठाण्यात तिहेरी हत्याकांडानं उडाली खळबळ! खरं कारण काय? पोलिस तपासातूनच होणार उलगडा!

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडामागे शेतीच्या वाटणीवरून आणि आईच्या पेन्शनवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. गुरुवार, ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या या थरारक घटनेत जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सरस्वतीबाई फत्तेसिंग सुरडकर (७०), संजय फत्तेसिंग सुरडकर (५५) आणि रणजीत संजय सुरडकर (२५) अशी मृतांची नावे आहेत. या तिहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर हा घटनेनंतर फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. दरम्यान, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक संशय असला, तरी हत्येमागील नेमके कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नाही.

तीन भाऊ, सात ते आठ एकर शेती अन् वाटणीवरून नाराजी?

सुरडकर कुटुंबात संजय फत्तेसिंग सुरडकर हा मोठा, दीपक फत्तेसिंग सुरडकर हा मधला, तर अजय फत्तेसिंग सुरडकर हा सर्वांत लहान भाऊ आहे. त्यांचे वडील फत्तेसिंग सुरडकर हे सैन्यात सेवेत होते. त्यांचे निधन झाल्यानंतर आई सरस्वतीबाई यांना पेन्शन मिळत असल्याची माहिती आहे. तिन्ही भाऊ आपापल्या कुटुंबासह स्वतंत्र राहत होते. कुटुंबाच्या नावावर सुमारे सात ते आठ एकर शेती असल्याचे सांगितले जाते.

प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही भावांना प्रत्येकी सुमारे दोन एकर शेती देण्यात आली होती, तर उर्वरित जमीन आई सरस्वतीबाई यांच्या नावावर होती. मोठा मुलगा संजय हा स्वतःच्या जमिनीसह आईच्या नावावरील जमिनीचीही मशागत करत असल्याची माहिती आहे. संजय शेलुद येथे कुटुंबासह राहत होता. आई सोमठाणा येथे स्वतंत्र राहत असली, तरी तिची देखभाल करण्यासाठी संजय ये-जा करत असल्याचे सांगितले जाते.

याच पार्श्वभूमीवर आईच्या नावावरील जमिनीचा वापर आणि पेन्शनच्या लाभावरून दीपकच्या मनात नाराजी असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मात्र, हा वाद नेमका किती जुना होता आणि त्याचा या हत्याकांडाशी थेट संबंध आहे का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या दिशेने पोलिस तपासातूनच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

शेतातील मोटारीच्या वायरवरून वाद; गावकऱ्यांनी केला होता समझोता!

गुरुवारी सायंकाळी सुमारे साडेपाच वाजण्याच्या सुमारास संजय आणि दीपक यांच्यात शेतात वाद झाल्याची माहिती आहे. संजयच्या विहिरीतील पाण्याची मोटार जळाल्याचे सांगितले जाते. ही मोटार बाहेर काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान दीपकच्या मोटारीची वायर तुटल्याने दोघांमध्ये वाद झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे.

सुरुवातीला मोटारीच्या वायरवरून सुरू झालेला वाद वाढत गेला. परिस्थिती चिघळत असल्याचे लक्षात येताच गावातील काही मध्यस्थांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही भावांमधील वाद मिटविल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दीपक आपल्या घरी निघून गेला. वरकरणी वाद मिटल्याचे दिसत असतानाच काही वेळातच या प्रकरणाने भयंकर वळण घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

वडिलधाऱ्यांचा वाद मुलापर्यंत पोहोचला?

शेतात झालेल्या वादाची माहिती संजयने फोनद्वारे आपला मुलगा रणजीत याला दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर रणजीत हा शेलुद येथून सोमठाणा येथे आला. प्राथमिक माहितीनुसार, संजय आणि रणजीत हे दीपकच्या घरासमोर जाऊन त्याला जाब विचारण्यासाठी गेले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यावेळी तिघांमध्ये पुन्हा वाद झाला असावा आणि त्यातून परिस्थिती हाताबाहेर गेली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे. संशयित दीपकने धारदार शस्त्राने संजय आणि रणजीत यांच्यावर हल्ला केल्याचा प्राथमिक संशय आहे. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, संजय आणि रणजीत नेमके कोणत्या कारणासाठी दीपकच्या घरी गेले होते, त्यावेळी त्यांच्यात काय संभाषण झाले आणि हल्ल्यापूर्वी नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली, याचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही.

आई सरस्वतीबाई यांचाही मृत्यू; आरोपी घटनास्थळावरून पसार….

या घटनेतील सर्वाधिक धक्कादायक बाब म्हणजे एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संजय आणि रणजीत यांच्यावरील हल्ल्यानंतर शेजारीच राहत असलेल्या आई सरस्वतीबाई यांच्यावरही हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला.

त्यानंतर संशयित दीपक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे. मात्र, तिन्ही जणांवर नेमका कोणत्या क्रमाने हल्ला झाला, आई सरस्वतीबाई यांच्यावर हल्ला करण्यामागे काय कारण होते आणि घटनेच्या वेळी घराजवळ नेमके काय घडले, याबाबत अद्याप अधिकृत खुलासा झालेला नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व बाबींचा उलगडा होण्यासाठी पोलिस तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

पोलिसांची घटनास्थळी धाव; श्वान पथक अन् ठसेतज्ज्ञांकडून तपास…..

तिहेरी हत्याकांडाची माहिती मिळताच चिखली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यासह महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वान पथक आणि ठसेतज्ज्ञ पथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकांनी घटनास्थळाची तपासणी करून तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. तिन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

लहान भाऊ अजयही खुनाच्या प्रकरणात कारागृहात….

दरम्यान, सुरडकर कुटुंबातील लहान भाऊ अजय फत्तेसिंग सुरडकर हा मागील सुमारे वर्षभरापासून एका खुनाच्या प्रकरणात कारागृहात असल्याची माहिती समोर आली आहे. गावातील एका दिव्यांग मुलाला विहिरीत टाकून त्याचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर असल्याचे सांगितले जाते.

त्यामुळे या कुटुंबावर आधीपासूनच खुनाच्या प्रकरणाचे सावट असताना आता एकाच कुटुंबातील आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याने सोमठाणा गाव हादरून गेले आहे. या दोन्ही प्रकरणांचा परस्परांशी काही संबंध आहे का, याबाबत मात्र कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही.

दीपकच्या अटकेनंतरच उलगडणार हत्याकांडाचे गूढ!

शेतीच्या वाटणीवरून सुरू असलेली कथित नाराजी, आईच्या पेन्शनचा मुद्दा, शेतात मोटारीच्या वायरवरून झालेला वाद आणि त्यानंतर एकाच कुटुंबातील तिघांचा झालेला मृत्यू, या घटनाक्रमामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, या सर्व बाबी सध्या प्राथमिक माहिती आणि संशयाच्या स्वरूपात आहेत.

या प्रकरणातील संशयित आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर याचा शोध घेणे हे पोलिसांसमोरील महत्त्वाचे आव्हान आहे. त्याच्या अटकेनंतरच घटनेचा नेमका घटनाक्रम, हत्येमागील कारण आणि या प्रकरणातील इतर महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोमठाण्यासह परिसरातील नागरिकांचे लक्ष पोलिस तपासाकडे लागले असून, या तिहेरी हत्याकांडाचे संपूर्ण सत्य समोर येण्याची प्रतीक्षा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!