Advertisement Advertisement

वडगाव तेजनमध्ये भरदिवसा चोरट्यांचा डल्ला!कपाट फोडून १५ हजारांची रोकड अन् एक तोळा सोनं लंपास!सोयाबीन काढणीसाठी मजुरांना द्यायचे पैसेही चोरट्यांनी पळवले!

वडगाव तेजन (बुलडाणा कव्हरेज न्युज) : गावात भरदिवसा घरफोडीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ऋषिकेश विष्णू धंदरे यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारत कपाट फोडून १५ हजार रुपयांची रोकड आणि एक तोळा सोन्याचे दागिने चोरून नेले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत असून, भरदिवसा चोरी झाल्याने गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनेतील विशेष बाब म्हणजे चोरीला गेलेली १५ हजार रुपयांची रक्कम सोयाबीन काढणीच्या कामासाठी मजुरांना देण्यासाठी ठेवण्यात आली होती. शेतातील कामासाठी लागणारे पैसेच चोरट्यांनी लंपास केल्याने धंदरे कुटुंबासमोर आर्थिक अडचण उभी राहिली आहे. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून रोकड आणि सोन्याचे दागिने पळविल्याने घराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी हात साफ केल्याने गावात एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणाचा तपास करून चोरट्यांचा तातडीने शोध घेणे, त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करणे, हे पोलिसांसमोरचे आव्हान आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावावा आणि चोरीस गेलेला मुद्देमाल परत मिळवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

WhatsApp Join Group!