चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडात आता नवनवे तपशील समोर येत आहेत. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची हत्या केल्याचा संशय असलेला मुख्य आरोपी दीपक फत्तेसिंग सुरडकर अद्याप फरार असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, घटनेवेळी उपस्थित असल्याची माहिती असलेल्या दीपकच्या २० वर्षीय मुलाला, जगदीशला, पोलिसांनी जवळच्या सवणा गावातून ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, जगदीशची नेमकी भूमिका काय होती, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही.
शेतीचा हिस्सा अन् आईच्या पेन्शनवरून घरात धुसफूस?
सोमठाणा येथील सुरडकर कुटुंबात संजय, दीपक आणि अजय असे तीन भाऊ होते. त्यांचे वडील फत्तेसिंग सुरडकर हे सैन्यात होते. त्यांच्या निधनानंतर आई सरस्वतीबाईंना पेन्शन मिळत होती. कुटुंबाकडे एकत्रितपणे ८ ते १० एकर शेती असल्याची माहिती आहे. आईच्या नावावर असलेली सुमारे दोन ते अडीच एकर जमीन संजयने आईला विश्वासात घेऊन स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा दीपकला राग होता, अशी माहिती समोर येत आहे. त्यातच आईच्या पेन्शनवरूनही दोन्ही भावांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जाते. या कारणांवरून कुटुंबात अनेक दिवसांपासून वादाची ठिणगी धुमसत असल्याची चर्चा आहे. मात्र, हत्याकांडामागे हेच नेमके कारण होते का, याचा अधिकृत उलगडा तपासानंतरच होणार आहे.
शेतातील मोटारीच्या वायरवरून वादाची ठिणगी!
८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास संजय आणि दीपक यांच्यात शेतात वाद झाल्याची माहिती आहे. संजयच्या विहिरीतील जळालेली मोटार काढताना दीपकच्या मोटारीची वायर तुटल्याने दोघांमध्ये बाचाबाची झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दीपकनेही संजयच्या मोटारसायकलची वायर तोडल्याची माहिती समोर आली आहे. या वादात गावातील काही मध्यस्थांनी हस्तक्षेप करून दोघांमधील भांडण मिटवले. त्यानंतर दीपक घरी निघून गेला.
दरम्यान, संजयने फोन करून मुलगा रणजीतला शेतातील वादाची माहिती दिली. त्यानंतर रणजीत शेलुद येथून सोमठाणा येथे आला. चुलत्याला जाब विचारण्यासाठी रणजीतने मित्रांनाही बोलावल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर हा वाद पुन्हा उफाळून आला आणि काही वेळातच परिस्थितीने गंभीर वळण घेतल्याचे सांगितले जाते.
घरासमोर पुन्हा वाद; पुढे नेमकं काय घडलं?
प्राथमिक माहितीनुसार, दीपकच्या घरासमोर पुन्हा वाद सुरू झाला. यावेळी दीपक आक्रमक झाल्याचे सांगितले जाते. त्याची आक्रमक भूमिका पाहून रणजीतसोबत आलेले काही तरुण मागे फिरून निघून गेल्याची माहिती आहे. त्यानंतर नेमका घटनाक्रम काय घडला, याबाबत अद्याप अधिकृत तपशील समोर आलेला नाही.
मात्र, या संघर्षात संजय फत्तेसिंग सुरडकर आणि त्यांचा मुलगा रणजीत संजय सुरडकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर दीपक शेजारी असलेल्या आई सरस्वतीबाई यांच्या घरी गेल्याचे आणि तिथेही हल्ला झाल्याचे सांगितले जाते. या घटनेत सरस्वतीबाई फत्तेसिंग सुरडकर (वय ७०), संजय फत्तेसिंग सुरडकर आणि रणजीत संजय सुरडकर या तिघांचा मृत्यू झाला. एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने सोमठाणा गावासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मुलगा जगदीश पोलिसांच्या ताब्यात; कथित वक्तव्याची चर्चा….
या हत्याकांडानंतर मुख्य आरोपी दीपकचा २० वर्षीय मुलगा जगदीश घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. पोलिसांनी शोध घेत त्याला जवळच्या सवणा गावातून ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणात जगदीशने, “खून माझ्या बापाने केला, मी नाही,” असे सांगितल्याची चर्चा आहे. मात्र, या कथित वक्तव्याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे जगदीशने नेमके काय पाहिले, त्याची या घटनेतील भूमिका काय आहे आणि त्याचा हत्याकांडाशी काही संबंध आहे का, याबाबत पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.
मुख्य आरोपीचा शोध सुरू; अनेक प्रश्न अनुत्तरित!
सोमठाणा येथील या तिहेरी हत्याकांडाने पोलिसांसमोर अनेक प्रश्न उभे केले आहेत. शेतीचा हिस्सा आणि आईच्या पेन्शनवरून सुरू असलेला वाद या घटनेमागचे कारण होते का? शेतातील मोटारीच्या वायरवरून सुरू झालेला वाद एवढ्या टोकाला कसा गेला? रणजीतसोबत आलेल्या तरुणांची नेमकी भूमिका काय होती? जगदीशने प्रत्यक्षात काय पाहिले? आणि तिहेरी हत्याकांडानंतर मुख्य आरोपी दीपक सुरडकर नेमका कुठे पसार झाला?
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके कामाला लागली असून, त्याच्या अटकेनंतर या प्रकरणातील घटनाक्रम आणि हत्याकांडामागील नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या समोर येत असलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, पोलिसांच्या अधिकृत तपासातूनच या प्रकरणातील सत्य समोर येणार आहे.














